Saamana - Padada Mohbbat Wala ...

11-09-2018 News

>>अमित आचरेकरसंचालक वा कॉर्पोरेशन

घर सजवताना आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतो. सणांच्या दिवसांमध्ये तर हे चक्र अधिक वेगाने फिरत असते. काहीतरी नवीन करावं ज्यामुळे घराचा लुक बदलेल असे आपले प्रयत्न असतात, या बदलासाठी प्रत्येकवेळी आपण आपल्या घरातील फर्निचर किंवा रंग बदलू शकत नाही. मग अशा वेळीस तुमच्या मदतीला घरातील पडदा धावून येतो. पडदे हा घरातील खूप महत्वाचा भाग आहे. यामुळे घराचे सुंदरीकरण होतेच, त्याचबरोबरीने आपल्या घरातील प्रायव्हसी जपली जाते.

पडद्याची निवड करताना पुढील गोष्टीचा विचार करावा

1. घराच्या रंगाप्रमाणे पडद्याच्या रंगाची निवड करावी, हॉल मधील पडदे वेगळे हॉलच्या रंगला साजेसे असावे. भिंतीचा रंग सौम्य असल्यास पडद्याची निवड करताना ती गडद रंगामध्ये करावी. सौम्य रंगाच्या भिंतीवर, गडद रंगाचे पडदे आणि त्यावर काही बारीक नक्षीकाम किंवा वेलबुट्टी असल्यास ते सुंदरता वाढवते.

2. पडदा घेताना त्याच्या कपड्याकडे लक्ष द्या. बंध असणारे,चुण्यांचे कापड इत्यादी. कॉटन, नेट, हँडलूम, एम्बॉस, लेस, नीटिंग वगैरे प्रकारातले पडदे छान दिसतात. पॉलिएस्टरमध्येही पडद्यांसाठी कापड उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, पॉलिएस्टर पडद्यांची फार देखभाल करावी लागत नाही. ते पावसाळ्यात पटकन सुकतात आणि त्यांचे रंगही लवकर फिके पडत नाहीत.

3. पडदा घेताना केवळ भिंतीचाच नाही तर घरातील फर्निचरचा सुद्धा विचार करावा.

4. भारदस्तपणा आणि सौंदर्याची आवड असणाऱ्यांनी कॉटनच्या पडद्यांचा विचार करावा. असे पडदे घर आणि ऑफिस दोन्हीमध्ये उठून दिसतात. क्रिएटिव्हिटी आणि सौंदर्यावर भर असेल तर सिल्कमध्ये आकर्षक डिझाइन्स आणि रंग निवडता येतील. या पडद्यांची वैशिष्ट्यं म्हणजे, ते अत्यंत तलम, मखमली स्पर्शाचे आणि अँटिक लूक देणारे असतात.

घरात पडदे लावताना होणाऱ्या या सामान्य चुका

हॉलमधील सजावटीचा विषय येतो तेव्हा, लहान चुकांचे सुद्धा मोठे परिणाम दिसू शकतात. तुम्ही जे काही करणार आहात त्याच्या कल्पना तंतोतंत आणि नीटनेटक्या असाव्या. सर्वात सामान्य चूक पडदे लावताना होते. त्या लक्षात न आल्याने झालेल्या क्षुल्लक चुकांमुळे खोलीचे स्वरुप बिघडते.

खूप कमी उंचीचे पडदे

सिलिंगच्या जवळ रॉड लावणे महत्त्वाचे आहे. पडद्याचा स्टॅण्ड लांब असावा, यामुळे पडद्यांची उंची वाढून खोलीला भव्य स्वरुप प्राप्त होईल. तसेच शक्य तेवढे सिलिंगच्याजवळ रॉड लावल्याची खात्री करुन घ्या.

योग्य मोजमाप करा

पडदे तयार करण्यासाठी घाई करू नका. आपण जिथे पडदे लाऊ इच्छिता तिथल्या खिडकी किंवा दरवाजाचे योग्य माप घेऊन खात्री करा. तसेच, पडद्याच्या रुंदीची खात्री करुन ते संरक्षित करणे आवश्यक आहे.

खूप लहान पडदे

खूप लहान पडदे खोलीची शोभा कमी करतात. खूप लहान तसेच जमिनिला न लोळणारे असे पडदे निवडा. खोलीच्या रंगाशी मिळते जुळते निवडा.

सुरकुत्या असलेले पडदे

सुरकुत्या असणारे पडदे घरातील सदस्यांचा आळशीपणा दर्शवितात. पडदे धुतल्यानंतर त्यांना इस्त्री करण्यास विसरु नका. यामुळे पडद्यांना वेगळ्याच प्रकारची चमक येते.

पडद्यावरील लूप्स/रिंग्स

पडद्याचे लूप्स किंवा रिंग्स पडद्याच्या मापाप्रमाणे ठरवणे फार गरजेचे असते नाहीतर पडद्याचा फॉल योग्य येत नाही. पडद्याच्या लूप्स/रिंग्स मधील अंतर 4 ते 5 इंच एवढे ठेवल्यास दोन रिंग्स मधील दुमड देखणी दिसेल.

बाजारात पडद्यांचे अनेक प्रकार आणि स्टाईल्स उपलब्ध आहेत. कपड्याची योग्य निवड आणि दरवाजा-खिडक्यांचे अचूक मोजमाप करून घेतलेले पडदे आपल्या घराची शोभा वाढवतील. सर्वांनी प्रेमात पडावे असे घर सजवता येईल.