Loksatta Article - Talk about Curtains

11-02-2019 News

घर खरेदी करताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. घरालगत कोणकोणत्या सेवासुविधा आहेत या सर्व गोष्टींची काळजी आपण घेत असतो. पण घरातील पडदे, बेडशीटस् यांच्या बाबतीत मात्र आपण फारसा विचार करत नाही. आपल्याला जो रंग आवडतो त्या रंगाची बेडशिट किंवा पडदे आपण विकत घेतो. पण छोटय़ा वाटणाऱ्या या दोन गोष्टी घरातील महत्त्वपूर्ण घटक आहेत. याच दोन गोष्टींमुळे घराचे संपूर्ण रूप बदलून जाते. घराचा लुक बदलेल असे आपले प्रयत्न असतात. या बदलासाठी प्रत्येक वेळी आपण आपल्या घरातील फíनचर किंवा रंग बदलू शकत नाही. मग अशा वेळेस तुमच्या मदतीला घरातील पडदा हा घटक धावून येतो. पडदे हा घरातील खूप महत्त्वाचा भाग आहे. यामुळे घराच्या सौंदर्यात तर वाढ होतेच, त्याच बरोबरीने आपल्या घरातील प्रायव्हसीही जपली जाते.

घरातील पडदे खरेदी करताना या गोष्टीचा नक्की विचार करा.

घरामध्ये कोणत्याही गोष्टीची निवड करताना प्रथम तुमचा पडदा आणि त्यांचे रंग यावर विचार करा. त्या पडद्यावरील प्रत्येक रंगाच्या शेड्सचा फर्निचर आणि भिंतींच्या रंगसंगतीचा विचार करावा. कदाचित तुमच्या पडद्यांच्या रंगसंगतीला मिळताजुळता असा फर्निचरचा रंगही मिळेल. तुमच्या पडद्यांचा रंग पांढरा असेल तर आसपासचं फर्निचर हे काळ्या रंगाचं निवडावं. म्हणजे काहीशी विरुद्ध रंगसंगती होईल; पण तुमच्या घराची शोभाही वाढेल हे नक्की!

पडदे लावताना खिडकीच्या सहा इंच वर लावावा आणि सोफ्याच्या किंवा खुर्चीच्या थोडा खाली जाईल असं बघावं. म्हणजे सिलिंगची उंची अधिक असेल तर काहीशी कमी दाखवल्याचा भास होतो.

पडद्यांचा रंग कधीही गडद निवडू नका. कारण अशा गडद रंगांमध्ये सूर्यप्रकाश थेट पडद्यांपर्यंत पोहोचतो आणि अति सूर्यप्रकाशामुळे पडद्याचं कापड खराब होण्याची शक्यता अधिक असते. ताग, वेलवेट किंवा सिल्क आदी प्रकारचे पडदे हा अतिशय चांगला पर्याय असू शकतो. ताग किंवा वेलवेटचे पडदे घरात उष्णता येण्यापासून परावृत्त करतात, त्यामुळे घर थंड राहण्यास मदत होते.

भिंतींचा रंग गडद असेल तर फिकट रंगाचे पडदे लावा आणि फिकट भिंती असतील तर गडद रंगाचे पडदे लावावेत. विरुद्ध रंगसंगतीमुळे घराला शोभाच येते.

आजकाल फ्रेंच पद्धतीच्या मोठय़ा खिडक्या असतील तर त्याला लांब पडदे लावावेत. म्हणजे खिडक्यांची भव्यता काहीशी कमी होते. तसंच अशा खिडक्यांना आजकाल झालर पद्धतीचे पडदे लावले तरीही ते शोभून दिसतात. अशा पडद्यांमध्ये तुम्ही रंगसंगतीही करू शकता. ती आकर्षकही दिसते आणि घराचा संपूर्ण लुकही बदलून जातो.

काही जण मोठमोठय़ा डिझाइनचे पडदे लावतात; पण तुमचं घर मोठं असेल तरच असे पडदे लावावेत. कारण अशा मोठय़ा डिझाइनमुळे घर लहान दिसतं. लहान घर असलेल्यांनी शक्यतो प्लेन किंवा बारीक नक्षीचे पडदे लावावेत. तसंच घर लहान असेल तर अधिक गडद पडदेही लावू नयेत. त्यामुळे खोलीचा आकार कमी दिसतो.

आजकाल पडदे गुंडाळून किंवा बांधून ठेवण्यासाठीदेखील पट्टय़ांपेक्षा कर्टन क्लच, मोत्याच्या माळा असे विविध पर्याय आले आहेत. त्यांचा वापर करताना पडद्याची रंगसंगती आणि घराची रंगसंगती याचाही विचार करा. त्यानुसार त्यांची निवड करा. त्यामुळे पडद्याबरोबरच तुमच्या घराची शोभाही वाढेल.

पडदा घेताना त्याच्या कपडय़ाकडे लक्ष द्या. बंध असणारे, चुण्यांचे कापड, इत्यादी. कॉटन, नेट हँडलूम, एम्बॉस, लेस, नीटिंग वगरे प्रकारातले पडदे छान दिसतात. पॉलिएस्टरमध्येही पडद्यांसाठी कापड उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, पॉलिएस्टर पडद्यांची फार देखभाल करावी लागत नाही. ते पावसाळ्यात पटकन सुकतात आणि त्यांचे रंगही लवकर फिके पडत नाहीत.

पडदा घेताना केवळ भिंतीचाच नाही तर घरातील फर्निचरचासुद्धा विचार करावा.

भारदस्तपणा आणि सौंदर्याची आवड असणाऱ्यांनी कॉटनच्या पडद्यांचा विचार करावा. असे पडदे घर आणि ऑफिस दोन्हीमध्ये उठून दिसतात. क्रिएटिव्हिटी आणि सौंदर्यावर भर असेल तर सिल्कमध्ये आकर्षक डिझाइन्स आणि रंग निवडता येतील. या पडद्यांची वैशिष्टय़ म्हणजे, ते अत्यंत तलम, मखमली आणि अँटिक लुक देणारे असतात.

घरात पडदे लावताना होणाऱ्या या सामान्य चुका

हॉलमधील सजावटीचा विषय येतो तेव्हा, लहान चुकांचेसुद्धा मोठे परिणाम दिसू शकतात. तुम्ही जे काही करणार आहात त्याच्या कल्पना तंतोतंत आणि नीटनेटक्या असाव्यात. पडदे लावताना सामान्य चुका लक्षात न आल्याने खोलीचे रूप बिघडते.

खूप कमी उंचीचे पडदे

सिलिंगच्या जवळ रॉड लावणे महत्त्वाचे आहे. पडद्याचा स्टॅण्ड लांब असावा, यामुळे पडद्यांची उंची वाढून खोली मोठी दिसते. तसेच शक्य तेवढे सिलिंगच्याजवळ रॉड लावल्याची खात्री करून घ्या.

योग्य मोजमाप करा – पडदे तयार करण्यासाठी घाई करू नका. आपण जिथे पडदे लावू इच्छिता तिथल्या खिडकी किंवा दरवाजाचे योग्य माप घेऊन खात्री करा. तसेच, पडद्याच्या रुंदीची खात्री करून ते संरक्षित करणे आवश्यक आहे.

खूप लहान पडदे – खूप लहान पडदे खोलीची शोभा कमी करतात. खूप लहान तसेच जमिनीपर्यंत न लोळणारे असे पडदे निवडा. खोलीच्या रंगाशी मिळतेजुळते पडदे निवडा.

सुरकुत्या असलेले पडदे – सुरकुत्या असणारे पडदे घरातील सदस्यांचा आळशीपणा दर्शवितात. पडदे धुतल्यानंतर त्यांना इस्त्री करण्यास विसरू नका. यामुळे पडद्यांना वेगळाच लुक येतो.

पडद्यावरील लूप्स/रिंग्स – पडद्याचे लूप्स किंवा रिंग्स पडद्याच्या मापाप्रमाणे ठरवणे फार गरजेचे असते, नाही तर पडद्याचा फॉल योग्य येत नाही. पडद्याच्या लूप्स/रिंग्समधील अंतर ४ ते ५ इंच एवढे ठेवल्यास दोन रिंग्समधील दुमड देखणी दिसेल.

बाजारात पडद्यांचे अनेक प्रकार आणि स्टाईल्स उपलब्ध आहेत. कपडय़ाची योग्य निवड आणि दरवाजा-खिडक्यांचे अचूक मोजमाप करून घेतलेले पडदे आपल्या घराची शोभा वाढवतील. सर्वानी प्रेमात पडावे असे घर सजवता येईल.