Decorate the house in Diwali

06-11-2018 News

घर म्हणजे नुसत्या चार भिंती आणि एक छप्पर नव्हे; तर घर म्हणजे जेथे परिवाराची व्याख्या पूर्ण होते. घरामधील प्रत्येक व्यक्ती आपले सुख-दु:ख वाटून सर्वासोबत त्या घरामध्ये राहत असतो. परिवारातील माणसांमुळे त्या वास्तूमध्ये मायेची ऊब येते. घरातील सदस्यांमुळेच घराला घरपण येते. असे आपले लाडके घर सजवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. प्रत्येक सणाला घराची संपूर्ण रचना बदलणे शक्य नसते. त्यामुळे घरातील छोटय़ा-मोठय़ा गोष्टीमध्ये बदल करून तुम्ही घराला वेगळेपण देऊ शकता.

पडदे

घरातील पडदे ही गोष्ट दिसायला जरी छोटी वाटत असली घर सजावटीत त्यांचे खूप महत्त्व आहे. तुम्ही घरातील पडदे बदलून घराला एक नवा लुक देऊ शकता. त्यासाठी पडद्याच्या रंगसंगती आणि कापड या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवे. तुमच्या खिडकीच्या उंचीपेक्षा काहीसे लांब आणि उभं डिझाइन असलेले पडदे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात काहीसा आडवा पसरट असा सोफा घ्यायला लागेल. म्हणजे तुमच्या घराचं सौंदर्य खुलून दिसेल. पडदे लावताना खिडकीच्या सहा इंच वर लावावा आणि सोफ्याच्या किंवा खुर्चीच्या थोडा खाली जाईल असं बघावं. म्हणजे सििलगची उंची अधिक असेल तर काहीशी कमी दाखवल्याचा भास होतो. तुम्हालाही या रूममध्ये वावरताना प्रसन्न वाटेल. तुमच्या पडद्यांचा रंग पांढरा असेल तर आसपासचं फर्निचर हे गडद रंगाचं निवडावं. म्हणजे काहीशी विरुद्ध रंगसंगती होईल; पण तुमच्या घराची शोभाही वाढेल हे नक्की.

कुशन

घरातील सोफा हा बठकीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा घटक आहे. सणांच्या दिवसांमध्ये माजघरातील सोफ्यावर कुशनसाठी सोनेरी, पिवळसर सोनेरी, निळा, सफेद या रंगाचा वापर करा. त्याचप्रमाणे खणाच्या कापडाचा वापर करूनसुद्धा तुम्ही माजघराला वेगळा ग्लॅमरस लुक देऊ शकता. त्याच प्रमाणे सिल्क, लिनन, अजरक या कापडाचा वापर करूनसुद्धा तुम्ही एक वेगळाच एलिट लुक देऊ शकता. तुमच्या सोफ्याच्या किंवा बठकीचा आकार बघूनच तुमच्या कुशनचा आकार ठरवा.

बेडशीट

चादर हा नेहमीचा शब्द जाऊन त्याची जागा आता बेडशीट या ग्लॅमरस शब्दाने घेतलेली आहे. कित्येकदा ही बेडशीट निवडण्यात अनेक जण चोखंदळ असतात. काही चादरी घरी आलेल्या पाहुण्यांचं लक्ष वेधून घेत असतात. म्हणूनच बेडशीटची निवड करताना काही गोष्टी लक्षात घेतल्यात तर तुमची बेडशीट तुमच्या घराला उठाव आणेल यात काही शंका नाही. बेडशीट निवडताना प्रत्येक खोलीच्या वैशिष्टय़ाचा विचार करावा. म्हणजे तिथे असलेल्या फर्निचरची रंगसंगती, तसंच घरात येणारा उजेड, मुख्य म्हणजे खोलीचा आणि पडद्याचा रंग. या सगळ्या वैशिष्टय़ांचा विचार करणं आवश्यक आहे. कित्येक जणांना दर आठवडय़ाला बेडशीट बदलायची नसते म्हणून ते बेडशीटचा रंग निवडताना गडद रंगाचा विचार करतात. पण गडद रंग निवडताना त्यावरची रंगसंगती आणि डिझाइनही विचारात घ्यायला हवी. खूप मोठी आणि बटबटीत डिझाइन असलेली बेडशीट ही खोलीच्या सौंदर्यात भर टाकण्यापेक्षा ती खोलीच चित्रं बिघडवते. दिवाणखान्यातल्या बेडशीट या शक्यतो फिक्या रंगांच्याच असाव्यात. फिक्या रंगाच्या बेडशीट या खुलून दिसतात. बेडरूममध्ये खरं म्हणजे प्रत्येक खोलीतच शिरल्यावर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे. पण त्यातही बेडरूम ही जागा आरामाचीच असते. म्हणून तिथल्या बेडवरची चादर पाहून त्या बेडवर झोपावंसं वाटलं पाहिजे. म्हणूनच तिथल्या चादरीचा रंग फिकाच असावा. खोलीत प्रवेश केल्यावर प्रसन्न वाटायला हवं.

रंग

भारतीय वास्तूमध्ये हिरव्या रंगाला वेगळे महत्त्व असते म्हणून घराला रंग देताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे. पिवळ्या रंगाचे फार महत्त्व आहे. पिवळा रंग मनाला शांती देतो. घराच्या भिंतीशिवाय दारे आणि खिडक्यांना नेहमी गडद  रंगाने रंगवायला पाहिजे.